स्वप्नपरी
- Akash Jagtap
- Sep 25, 2018
- 1 min read
काल स्वप्न एक पडले,
स्वप्नात पाऊस होता,
रस्ता होता ओला आणि,
हवेत गारवा होता
खिडकी होती उघडी,
थेंबांची टपटप होती,
मेणबत्ती लावलेली,
वीज गायब होती
आणखी एक टपटप,
थेंबाची पण ती नव्हती
सँडल घालून धावत,
'कोण' येत होती?
दरवाज्यावरची टकटक,
ऐकून मी गोंधळलो
दार उघडून पाहता,
मी ही स्तब्ध झालो
दारात उभी ती एक,
मनमोहक परीच होती
वाटली परिकथांमधली,
पण आली खरीच होती,
केस होते मोकळे,
केसांत पाणी होते
थेंब जे पडले त्यातून,
मोत्यांचे मनी होते
दारावरच थांबलो बघत,
बोलायचेही कळेना
हिरवळ होती त्याक्षणात,
शब्दांना अंकुर फुटेना
'आत येऊ का' ती म्हणाली,
गोंधळून म्हणालो 'कशाला?'
दचकून केली सारवासारव,
'या ना, थांबल्या कशाला?'
आत येऊन म्हणते कशी,
'मी थोडा वेळ बसू का?'
'पाऊस फार जोरात आहे,
तो जाईपर्यंत थांबू का?'
'मग तर पाऊस थांबूच नये',
चुकून शब्द निघाले
पटकन म्हणाली 'काय?'
म्हणताना तिचे स्मित आले
'तुम्हाला नसेल हरकत तर,
केस मला कोरडे करायचे होते'
हरकत तर होतीच मला,
सुंदर ते ओलेच ठेवायचे होते
'ठीक आहे चालेल मला,
नाहीतर सर्दी होईल तुम्हाला'
ती म्हणाली, 'धन्यवाद,
थोडी कॉफी बनवाल आपल्याला?'
आता मात्र हद्द झाली,
कशी सांगते इतकी हक्काने,
पण मीसुद्धा नरमलो मग,
'आपल्याला' या शब्दाने
केस कोरडे करून आली,
मग 'आम्ही' कॉफी घेतली,
पाऊस सुद्धा थांबला,
'आता निघायची वेळ झाली.'
'नक्की विचार करून जा,
पावसाचा भरवसा नाही'
वाटेत तो लागला तर,
तिथे कॉफी मिळणार नाही'
खुदकन गालात हसून म्हणाली,
'तुम्हाला भेटून आनंद झाला,
स्वभाव छान आहे तुमचा,
पुन्हा भेटायला आवडेल तुम्हाला'
पाऊस नकोसा असतो मला,
पण तेव्हा पाहिली वाट त्याची,
शेवटच्या 'गुड बाय' पर्यंत,
तो येईल होती खात्री माझी
तो काही आला नाही,
आता खरंच ती जात होती,
गेटवर सोडून आलो तेव्हा,
मेणबत्तीची विझली वात होती
धडपडून मग पेटवली ती,
उजेड मंद असा पडला
उजेड पडल्यानन्तर टेबलवर,
तिचा मोबाईल दिसला
इतक्यात टपटप पुन्हा झाली,
ती 'सँडल' वाली पुन्हा आली
नेमका पाऊसही जोरात आला,
तिची भेट पुन्हा झाली
ऊर्जा अशी होती तेव्हा,
तिने मला जाग आली
आजूबाजूला ती नव्हती,
एक होती रिकामी खोली
पाऊस नव्हता काहीच,
मनात म्हणलो, 'स्वप्न होते!'
पुन्हा झोपायची इच्छा झाली,
स्वप्न माझे अपूर्ण होते !!!
-आकाश
Comments