प्राणिसंग्रहालयातला निरागस वाघ
- Akash Jagtap
- Sep 27, 2018
- 1 min read
प्राणिसंग्रहालयातला निरागस वाघ
वैतागून आला वाघ,
प्राणिसंग्रहालयातून बाहेर,
भयभीत झाली जनता,
पळत सुटली चौफेर
पहिल्यांदा वाघाने,
चौकट होती ओलांडली
अनोळखी रस्ते पाहून त्याची
गतीच सगळी खुंटली
"वाघ आला" म्हणता म्हणता,
सगळंच झालं सुमसाम
शटर बंद, रस्ता रिकामा
मच्छरही नाही लांब लांब
वाघ असणे काय असते,
हे वाघालाच आज कळाले
आणि हा सगळा गोंधळ पाहून
त्याचेही थोडे अवसान गळाले
रस्त्यामधील अंध भिकारी,
गॉगल फेकून पळत सुटला
मुजोर रिक्षावाल्यांचाही
फुकटातच पत्ता कटला
फळवाले, भाजीवाले
टोपले सोडून धावत सुटले
स्कुटरवाले आजोबा ही,
विल्ली मारून पळत सुटले
नैसर्गिक भाषेत वाघ म्हणाला
"काय झालं रे एवढं?"
तीही छोटी डरकाळीच
पण भय त्याचं केवढं
पिंजऱ्यात असताना डिवचणारे,
पळत सुटले तरातरा
त्याला कळला कसा असतो
मोकळ्या वाघाचा दरारा
अधिकारी आले पकडायला,
उतरले गाडीतून पटपट,
मोकळा वाघ बघून मग,
ते ही कापू लागले लटलट
मग त्याला कळाला,
त्याचा नैसर्गिक स्वभाव,
स्वतःला म्हणला मग,
"चुकीच्या ठिकाणी जन्म घेतला राव"😜
-आकाश
Comments